शक्ती प्रदर्शनाद्वारे केला उमेदवारी अर्ज दाखल
डोंबिवली दि.24 ऑक्टोबर : तिरुपती बालाजी यांचा आशिर्वाद आपल्या पाठीशी असल्याने आपण या निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून येणार असा विश्वास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीणमधील उमेदवार सुभाष भोईर यांनी व्यक्त केला. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सागर्ली येथील तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन भोईर यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या यादीद्वारे सुभाष भोईर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आज लगेचच भोईर यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी सागर्ली येथील तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. त्यानंतर सागर्ली येथून सरोवर हॉटेल, शेलार चौक मार्गे घारडा सर्कलपर्यंत ढोल ताशांच्या गजरात मोठी रॅली काढण्यात आली. आणि मग वै. ह.भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील निवडणूक कार्यालयात महाविकास आघाडीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुभाष भोईर यांनी आपला अर्ज दाखल केला. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना भोईर यांनी आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी सुभाष भोईर यांच्यासह संतोष केणे, वंडार पाटील, गुरुनाथ खोत, धनंजय बोडारे, अभिजीत सावंत, माजी नगरसेवक मुकेश पाटील, वसंत भगत यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.