ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नुकतीच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रोहन घुगे यांनी नदीची पाहणी केली आणि जलपर्णी हटवण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मदतीने योजना राबवली जाईल, असे सांगितले. मात्र, तज्ज्ञांच्या मते जलपर्णी ही खरी समस्या नसून फक्त प्रदूषणाचा परिणाम आहे.
जलपर्णी म्हणजे प्रदूषणाचे लक्षण, मूळ समस्या नाही!
उल्हास नदीसह अनेक नद्यांमध्ये जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढते, याचे कारण म्हणजे नदीत मिसळणारे सांडपाणी आणि औद्योगिक कचरा. नदीत मोठ्या प्रमाणावर नायट्रेट्स आणि फॉस्फेट्स आल्याने जलपर्णी वाढते. त्यामुळे जलपर्णी काढल्याने समस्या सुटत नाही, कारण प्रदूषित पाणी तसेच राहते.
CEO साहेब, जलपर्णी काढून प्रश्न सुटणार नाही!
जर प्रशासनाला खरोखरच नदी वाचवायची असेल, तर केवळ जलपर्णी हटवण्यापेक्षा नदी आणि सांडपाणी वेगळे करण्यावर भर द्यावा.

उल्हास नदी स्वच्छतेसाठी त्वरित आवश्यक उपाय:
1.स्वतंत्र सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Sewage Treatment Plant – STP) सुरू करणे.
2.गटारांचे आणि औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडण्यावर कठोर बंदी.
3.कारखान्यांना त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास भाग पाडणे.
4.नदीकिनारी हरितपट्टा (Green Belt) विकसित करून प्रदूषण रोखणे.
5.ग्रामपंचायत, नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन जलप्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करणे.
उल्हास नदी पुनरुज्जीवनासाठी जलपर्णी काढणे हा तात्पुरता उपाय असून ही एक मलाई खाणाऱ्यांची रोजगार हमी योजना म्हणून सामान्य लोक ह्या कृतीकडे पाहतात, पण खरी गरज आहे ती गटार आणि नदी वेगळे करण्याची! ठाणे जिल्हा परिषदेने त्वरित यावर उपाययोजना करावी, अन्यथा उल्हास नदी भविष्यात अजूनच प्रदूषित होईल.
उल्हास नदी बचाव कृती समिती ….