सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा झाला आमदार विश्वनाथ भोईर यांचा वाढदिवस
कल्याण दि.4 एप्रिल :
विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. मात्र त्यातही कल्याणच्या वृद्धाश्रमातील आजी – आजोबांनी दिलेल्या अनोख्या प्रेमळ शुभेच्छांनी आमदार विश्वनाथ भोईर हे चांगलेच भारावून गेल्याचे दिसून आले.
कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर, बुद्ध विहारांना आवश्यक वस्तूंची भेट, दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये अन्नदान, महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छावा चित्रपटाचा मोफत शो यासह वृद्धाश्रमातील व्यक्तींना फळ वाटप अशा भरगच्च सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये उंबर्डे येथे महाआरोग्य शिबीर, आधारवाडी येथील बुद्धविहारासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा तर बारावे येथील बुद्धविहारासाठी खुर्च्यांची भेट, होलीक्रॉस शाळेजवळील वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना फळ वाटप, छाया टॉकीज परिसरातील सदिच्छा या दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी अन्नदान आणि केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या छावा चित्रपटाचा मोफत शोचे आयोजन करण्यात आले होते.
यातील शांतीधाम वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी तर चक्क अतिशय सुरामध्ये “बार बार ये दीन आये, बार बार ये दिल गाये” या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या माध्यमातून आमदार विश्वनाथ भोईर यांना वाढदिवसाच्या प्रेमळ आशीर्वादरुपी शुभेच्छा दिल्या. ते पाहून आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह उपस्थित सर्वच जण अतिशय भारावून गेले होते.
वैयक्तीक कारणास्तव गेली 3 वर्षे आमदार भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला नव्हता. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत दिग्विजयाने कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. त्यांच्या आग्रहास्तव आपण यावर्षी आपला वाढदिवस सामाजिकरीत्या साजरा करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी सांगितले. तर येणारा आपला प्रत्येक वाढदिवस आपण शांती भवन वृद्धाश्रम आणि सदिच्छा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या संस्थेसोबत साजरा करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, गणेश जाधव, माजी नगरसेविका वैशाली भोईर, उपशहरप्रमुख सुनिल खारूक, विभागप्रमुख रामदास कारभारी, डॉ. धीरज पाटील, चिराग आनंद, युवासेना चिटणीस वैभव विश्वनाथ भोईर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.