‘कामाची गुणवत्ता पाहिल्यावर त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे (१२) : ठाणे महापालिका क्षेत्रात विविध कामासाठी निधी दिला आहे. ती कामे प्रत्यक्षात झालेली पाहून, त्यांची गुणवत्ता पाहून त्यासाठी निधी दिल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी, आनंद योग कुटीर आणि हँगिंग गार्डन, रघुनाथ नगर, मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण, किसन नगर, स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय, नळपाडा, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (०५ ठिकाणी), नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (०६ ठिकाणी), मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी, धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका, कशिश पार्क, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट, उपवन, ग्रीन यात्रेच्या मदतीने झालेलं जेल तलाव पुनरुज्जीवन, सेंट्रल मैदान, ओएनजीसीकडून तलाव साफसफाईसाठी मिळालेल्या यांत्रिक बोटी, राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा तलाव येथे संगीतमय कारंजे या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच, रहेजा जवळील उद्यानाचे भूमिपूजनही करण्यात आले.
मुख्यमंत्री झाल्यावर आणि त्याआधी नगरविकास मंत्री असताना धोरणात बदल करून कायद्यात सुधारणा करून योजनांचा फायदा जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. योजनांचा फायदा नागरिकांना मिळावा यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोहोचवला आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यासपीठावर, खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक राम रेपाळे, एकनाथ भोईर, विकास रेपाळे, नम्रता भोसले, मीनल संख्ये, परिशा सरनाईक, गुरुमुख सिंग, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे आणि उमेश बिरारी आदी उपस्थित होते.
मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे रुग्णालयाच्या विस्तारामुळे आणखी ८० रुग्ण खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होतो आहे. अशा प्रकारचे कॅशलेस रुग्णालय प्रत्येक क्लस्टर प्रकल्पात असावे असे निर्देश आपण आयुक्तांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन येथे ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधला.
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना १५ हजारांचा प्रोत्साहन भत्ता
एनयूएचएम व क्षयरोग विभागामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात येते. त्यांना वेतनही शासनाकडून देण्यात येते. ती रक्कम कमी असल्याने त्यांना देय असलेल्या वेतनामध्ये १५ हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता ठाणे महापालिका देणार असल्याची घोषणा याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
२९ कुटुंबीयांचे स्वप्न साकार होणार
हाजुरी येथील रस्ता रुंदीकरणात २००१ मध्ये विस्थापित झालेल्या २९ कुटुंबियांच्या जागेचे स्वप्न साकार होणार आहे. त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते, सदनिका देणार असल्याची पत्रे प्रदान करण्यात आली.
विद्यार्थीनींना सायकल वाटप
तसेच, ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ योजनेअंतर्गत स्टेट बँकेच्या सीएसआर फंडातून शाळा क्रमांक ९ आणि ६५ मधील विद्यार्थिनींना सायकल देण्यात आल्या. त्याचे वाटपही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर, शाळा क्रमांक १८ ला पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली.
प्रशिक्षण केंद्र व व्हर्चुअल रेडीओ स्टुडीओ
ठाणे महापालिकेने रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी, ठाणे नॉर्थ आणि ठाणे ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रोटरी नॉलेज एन्हान्समेंट अँड फॅकल्टी सेंटर’च्या माध्यमातून राबविण्यात येणारा ‘स्टुडंट डेव्हलपमेंट अँड हॅपिनेस इंडेक्स’ कार्यक्रम राबविण्यासाठी ठाणे पालिका शाळा क्र. १९ मध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. तसेच पालिका शाळेतील मुलांसाठी व्हर्चुअल रेडीओ सेंटरच्या माध्यमातून दोन व्हर्चुअल स्टुडीओ देखील शाळा क्र. १९ येथे रोटरीच्या सहकार्याने पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते या प्रशिक्षण केंद्राचे व व्हर्चुअल रेडीओ स्टुडीओचे उदघाटनही करण्यात आले.
लोकार्पण झालेल्या प्रकल्पांची माहिती –
१. आनंद योग कुटीर आणि हँगिंग गार्डन, रघुनाथ नगर
प्रवेश लॉबी, ध्यान कक्ष, स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधन गृह व चेंजिंग रुम, स्टेज, टेरेस हँगिंग गार्डन आदी सेवासुविधा उपलब्ध आहेत.
२. मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचे विस्तारीकरण, किसन नगर
मातोश्री गंगूबाई शिंदे रुग्णालयामध्ये विविध उपचारपध्दती मोफत उपलब्ध आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, अत्याधुनिक यंत्रणा या ठिकाणी नव्याने बसविण्यात आले असून, जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ मिळावा यासाठी रुग्णालयाचा विस्तार करण्यात आला आहे. ८० रुग्ण खाटा वाढून आता एकूण १७० रुग्ण खाटा झाल्या आहेत.
३. स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक रुग्णालय, नळपाडा
हे १०० खाटांचे रुग्णालय, घोडबंदर रोड, नळपाडा येथे नव्याने उभारले असून, या ठिकाणी अद्ययावत वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये स्वागत कक्ष, लॉबी, ओपीडी, युजीएस रुम, पॅथॉलॉजी लॅब, सीटी स्कॅन, प्रतिक्षा विभाग, सर्वसाधारण वॉर्ड, विलगीकरण कक्ष, व्यवस्थापक कक्ष, कर्मचारी रुम, शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयु, कॅथलॅब आदी सुविधा उपलब्ध असणार आहेत.
४. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (०५ ठिकाणी)
गोरगरीब नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात यापूर्वी विविध ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. आता येऊर, गणेशनगर, पानखंडा, पातलीपाडा, कोलशेत या ठिकाणी नव्याने आपला दवाखाना सुरू करण्यात येत आहे.
५. नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर (०६ ठिकाणी)
आपला दवाखान्याच्या धर्तीवर महापालिका क्षेत्रात नेहरु नगर, साबे गाव, दातिवली, खिडकाळी, कोपरी, राऊत गार्डन येथे नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे उभारण्यात आली आहेत. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध करुन पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येतील. येथे बाह्यरुग्ण सेवा व औषधोपचार, चाचण्या, गर्भवती मातांची तपासणी, समुपदेशन, लसीकरण, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन ई-सेवा असणार आहे.
६. मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन, हाजुरी
हाजुरी येथे मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे ज्येष्ठांचे नंदनवन या इमारतीचे ४५४० चौ.फुटांचे बांधकाम आहे. या ठिकाणी बहुउद्देशीय सभागृह, व्यायामशाळा, चेजिंग रुम, लॉकर्स रुम, योगा सेंटर इंडोअर गेम्स, वाचनालय, प्रसाधन गृह आदी सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
७. धर्मवीर आनंद दिघे वाचनालय आणि अभ्यासिका, कशिश पार्क
ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, ऍम्पिथिएटर, कॉन्फरस हॉल, संगणक, डिजीटल लायब्ररी, स्टोअर रुम उपलब्ध आहे. या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित पुस्तकांचा संग्रह तसेच विविध भाषांमधील पुस्तके उपलब्ध आहेत. ६०५४ चौ.फुट जागेत हे ग्रंथालय आहे.
८. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाट, उपवन
बनारस घाटाच्या धर्तीवर घाटाची निर्मिती, या ठिकाणी बुरुज उभारुन, कारंजे, सुशोभिकरण, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. घाटाची लांबी १४० मीटर आहे.
९. जेल तलाव पुनरुज्जीवन, सेंट्रल मैदान
जेल तलावाच्या संवर्धनाचे काम मे.ग्रीन यात्रा या संस्थेच्या माध्यमातून मार्च ते जून २०२४ या कालावधीत करण्यात आले. या तलावाचे क्षेत्रफळ ६.८१ एकर असून, यामधून ३० हजार मेट्रीक गाळ काढला आहे. जैवविविधतेच्या दृष्टीने तलावाचा मध्यभागी लहान बेट तयार केले. पाण्याची गुणवत्ता सुधारुन याची खोली वाढण्यासही मदत झाली आहे.
१०. तलाव साफसफाई
ठाण्यातील तलावांची अत्याधुनिक पध्दतीने साफसफाई व्हावी यासाठी मे. ओएनजीसी यांच्यातर्फे ०६ रोबोटीक बोट उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असून, या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येईल. एकावेळी २०० किलो इतका कचरा गोळा करण्याची क्षमता आहे. ६ फुट लांब व ३ फुट रुंद असलेल्या बोट बॅटरीवर चालणार असून, चार्जिंग बॅटरी बसविण्यात आलेली आहे. १० ते १५ कि.मी. पर्यंतचा कचरा गोळा करण्याची क्षमता आहे.
११. राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा येथे संगीतमय कारंजे
कासारवडवली येथील राम मंदिर तलाव आणि मोघरपाडा तलाव येथे सुशोभिकरण करुन या ठिकाणी संगीतमय कारंजे उभारण्यात आले आहेत.
………………………………………………………………………..
Department Of Public Relations,
Thane Municipal Corporation, Thane
Off. Contact No. 022-25364779
…………………………………………………………………………
Official Website – www.thanecity.gov.in
E-mail – publicrelationtmc@gmail.com
Twitter – @TMCaTweetAway
Instagram – @smartcity_thane
आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101
============================