मुंबई, राज्यातील राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. यातील एक जागा भाजपला मिळाली असून भाजपने या जागेसाठी एकेकाळी शेकापचे नेते असणाऱ्या धैर्यशील पाटील यांना संधी दिली आहे. वास्तविक पाहता या जागेसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भंडारी यांचे नाव चर्चेत होते. भाजपच्या एका नेत्याने त्यासाठी फिल्डिंग लावली. पण गेल्या काही वर्षात बाहेरचे घेऊन त्यांना पावन करून घेण्याचे सत्र भाजपने सुरू केल्याने त्याचा फटका भांडारी यांच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला बसला आहे. माधव भांडारी हे भाजपतील ज्येष्ठ नेते आहेत. विविध विषयांचा दांडगा अभ्यास असणारे भांडारी कायम भाजपची बाजू लावून विरोधकांवर तुटून पडतात. असे असताना अशा अभ्यासू माणसावर भाजपने आतापर्यंत अन्याय केल्याची भावना कार्यकर्त्यात आहे. याच्या उलट काँग्रेसमधून भाजपत आलेल्या अशोक चव्हाण यांची तातडीने राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती. हर्षवर्धन पाटील असो, किसन कथोरे, प्रताप पाटील चिखलीकर असे विविध पक्षांमधील नेते भाजपने पक्षात घेऊन त्यांना लाभाची पदे दिली आहेत. याच्या विरुद्ध पक्षात निष्ठेने काम करणारे माधव भांडारी असो किंवा केशव उपाध्ये यांना कायम पक्षाने डावलले आहे. भाजपा हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. पण शिस्तीच्या नावाने बाहेरच्या मंडळींना पक्षात घेऊन काय साध्य होतंय, असा सवाल केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याशी सोयरिक करून भाजपा पुन्हा सत्तेवर आली, पण तरीही भीती कायम असल्याने अजित पवार यांना फोडून सत्तेत घेतले. याच अजित पवार यांच्यावर फडणवीस यांनी सिंचन घोटाळा प्रकरणी गंभीर आरोप केले होते. तेच फडणवीस आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. याचा जो जायचा तो संदेश मतदारांमध्ये गेला आणि भाजपला राज्यात लोकसभेला केवळ ९ जागांवर समाधानी व्हावे लागले. असे सगळे काही असताना भाजपचे राज्यातील नेतृत्व हे मानायला तयार नाही, त्यामुळेच की काय माधव भांडारी यांच्यासारख्या अभ्यासू माणसाला डावलत भाजपने धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. हे पाटील या निवडणुकीत विजयी होतीलही, पण माधव भांडारी यांच्यासारख्या निष्ठावंत मंडळींनी काय करायचे, कायम सतरंज्या उचलायच्या का, असाही सवाल आता विचारला जात आहे.

