येवला शहरातील शादीखाना इमारतीसाठी अधिकचा दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ – मंत्री छगन भुजबळ
सर्व जाती धर्मातील घटकांना सोबत घेऊन येवला मतदारसंघाचा विकास – मंत्री छगन भुजबळ
नाशिक,येवला,दि.६ ऑक्टोबर :- येवला मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे आपण केली आहे. ही विकास कामे करतांना कुठल्याही एका जाती धर्मासाठी नाही तर सर्व जाती धर्मातील घटकांना सोबत घेऊन मतदारसंघाचा विकास करण्यात येत आहे असे सांगत येवला शहरातील शादीखाना इमारतीसाठी अधिकचा दीड कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
हजरत सय्यद मोईन मिया साहेब यांच्या हस्ते, मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित अल्पसंख्यांक बहुल विकास कार्यक्रमाअंतर्गत शादीखाना तसेच अभ्यासिका वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी नगराध्यक्ष हुसेन शेख, अमजद शेख, मौलाना इस्माईल नजिम, सरदार रंगरेज, अर्षद सिद्दीकी, नौशाद सिद्दीकी, फैजल सिद्दीकी, मोबिन सिद्दीकी, मुश्ताक शेख, शफीक शेख, जावेद लखपती, मलिक मेंबर,निसार शेख, जावेद मोमीन, निजाम शेख, युनूस शेख, सोहेल मोमीन, पप्पू कोकणी, बबलू पटेल, परवीन शेख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सर्व जाती धर्माचा विकास व्हायला हवा. त्यादृष्टीने कुठलीही एका जाती धर्माला नाही तर सर्वांना सोबत घेऊन आपण विकासाची कामे केली आहे. येवला शहरात सुमारे ८० कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहे. शहरात स्वच्छता अभियान राबवून येवला शहर स्वच्छ सुंदर करण्यात आले आहे. नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी आपला दवाखाना केंद्र शहरात सुरू करण्यात आले आहे. जे मोठ्या रुग्णालयात उपचार करू शकत नाही अशा गोरगरीब नागरिकांना या तून आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रुग्णांना लवकरात लवकर उपचार मिळावे यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, शादीखाना मध्ये अधिक सुविधा मिळण्यासाठी अधिक दीड कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येऊन शादीखाना इमारतीला लागून इमारत व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. मुलींना मोफत शिक्षण देण्याची योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन मुलींना अधिक शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार धारेवर काम करणारे आपण आहोत. त्यामुळे सरकारमध्ये सामील होऊन आपण आपली विचारधारा सोडली नाही. आपण सरकार मध्ये सहभागी झाल्याने दोन हजार कोटी हून अधिक निधी उपलब्ध होऊन विकासाची कामे सुरू झाली आहे. येवला शहरात शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात आली आहे. या शिवसृष्टी प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेल्या सरदार आणि मावळ्यांचा इतिहास सर्वांसमोर मांडण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी हजरत सय्यद मोईन मिया साहेब म्हणाले की, शादीखाना सोबतच अभ्यासिका निर्माण करण्याचं महत्वपूर्ण काम मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. समाजातील जे गोर गरीब विद्यार्थी शिकू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही अभ्यासिका अतिशय महत्वपूर्ण आहे. मुस्लिम बांधवांच्या कब्रस्थान तसेच अनेक विकासाची कामे केली आहे त्याबद्दल मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांनी आभार मानले.

