मुंबई : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या आड मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. मालाड पूर्वेकडील मार्वे बीच टी जंक्शन जवळ दोन हजार चौरस मीटरचे तीन गाळे दोन दिवसांत बांधण्यात आले. मात्र पालिकेच्या पी उत्तर विभागाला याची तक्रार मिळताच जमीनदोस्त करण्यात आले.
मार्वे बीच जवळील टी जंक्शन येथे बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार मिळाली. तक्रार मिळताच पी उत्तर विभागाचे सहायक अभियंता विजय मानकर यांनी सांगितले की, उप अभियंता कुबेर शिंदे आणि प्रवीण मुलुक यांच्यावर बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. शिंदे आणि मुल्क यांनी तातडीने बेकायदा बांधकाम झाले त्याठिकाणी जाऊन बेकायदा बांधकामांवर हातोडा चालवला. निवडणूक काळात भूमाफिया अधिक सक्रिय होतात. बेकायदा बांधकाम झाल्याची माहिती मिळताच संबंधितांना नोटीस बजावण्यात येते. मात्र निवडणूक संपताच भूमाफिया न्यायालयात धाव घेतात आणि कारवाईला स्थगिती मिळते. त्यामुळे बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार मिळताच पी उत्तर विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती इमारत विभागाचे कार्यकारी अभियंता सागर राणे यांनी सांगितले.
पी उत्तर विभागातील मार्वे बीच जवळील टी जंक्शन बेकायदा बांधकाम झाल्याची तक्रार मिळताच तोडक कारवाई करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले.